आपला शेतकरी राजा
मागच्या लेखात महाराष्ट्राच्या विविध गोष्टींबद्दल तुम्ही वाचलत. आता थोडसं जाणून घेऊया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल.
महाराष्ट्र कृषिप्रधान राज्य आहे. इतर राज्याप्रमाणेच इथेही बहुतेक लोक शेतकरी आहेत. शेती करणे ही काही सोपी गोष्ट नसते. स्वतःतील जीव शेतकरी पिकांमध्ये ओतून त्यांची देखभाल करत असतात,त्यांचे संगोपन करत असतात.घाम गाळून मातीतून सोन्यासारखे पीक पिकवत असतो. स्वतःच्या जीवपेक्षा त्यांना पिकांची जास्त काळजी असते.शेतकऱ्यांसारखे खडतर आयुष्य जगणे हे सामान्य लोकांना शक्य नाही. शेतकऱ्यांच्या रक्तातच मुळी संघर्ष करण्याची,कठोरात कठोर परिस्थितून मार्ग काढण्याची वृत्ती असते.साधं राहणीमान पण उच्च विचारसरणी.
यावरून मला एक गाणं आठवलं-
-------------------------------------------------------------
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
दादाच्या मळ्यामंदी मोटंचं मोटं पानी
पाजिते रान सारं मायेची वयनी
हसत डुलत मोत्याचं पीक येतं
गुलाब ,जाई ,जुई ,मोगरा फुलवीतं.....
--------------------------------------------------------------
साधी माणसं या चित्रपटातील हे एक गाणं. शेती आणि शेतकऱ्यांबद्दल बरंच काही बोलून जातं.
स्वतःच्या सुखदुःखांची पर्वा न करता ते सतत इतरांसाठी झटत असतात. अन्नदाता म्हणून ते आपली जबाबदारी तत्परतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडत असतात.
तरीही देव त्यांची परीक्षा नेहमीच पाहत असतो.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काही संकटे ही येतच असतात.
कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाने ग्रासलेले असतात. पोटाची खळगी कशी भरावी यासाठी जीव तळमळत असतो. कर्जाचा डोंगर डोक्यावर, मग विचार करणंही कठीण होऊन जातं त्यांना. नकारात्मक गोष्टींवरभर न देता मी सकारात्मक गोष्टीच लिहत आहे.
सरकारचीही जबाबदारी आहे या अन्नदात्याला योग्य सुविधा पोहोचवण्याची. कर्जमाफ करण्याची. त्यांना ज्या काही सुविधा लागतात पीक पिकवण्यासाठी ते सगळं सरकारने पुरवलं पाहिजे. राजकारण दूर सारून नेत्यांनी बळीराजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी तत्परता दाखवली पाहिजे.
नदीजोड प्रकल्प आवश्यक आहे जेणेकरून दुष्काळाची परिस्थिती उद्भवणार नाही. पाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी कार्यशाळा घेतल्या पाहिजे. इतर देशांमध्ये जे आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं ते देशात आयात केलं पाहिजे अथवा स्वदेशी बनावट केली पाहिजे.शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे. पिकांच्या योग्य वाढीसाठी पोषक वातावरणांबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली पाहिजे.
या सगळ्यांबरोबरच पिकांना योग्य भाव देण्यात आला पाहिजे. कधी कधी खर्चापेक्षा कमी मोबदला मिळतो आणि शेतकरी हतबल होतो.शेतकऱ्यालाही स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यायची असते त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा असतो.
आपत्कालीन परिस्थितींमध्ये शेतकरीच सर्वसामान्यांचे पोट भरत असतात. भूक माणसाला वेडं करते तीच शमवण्याचे काम शेतकरी राजा करत असतो. अगदी आजचीच परिस्थिती बघा ना,कोरोनाने अख्या जगाला ग्रासले आहे. तरीदेखील हे शेतकरी खाण्याच्या वस्तू पुरवत आहेत. अन्नदाता असल्याने शेतकऱ्याला कधीच आराम किंवा विश्रांती घेता येत नाही. म्हणूनच आपणही आपल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करायला पाहिजे,अन्न वाया नाही घालवायला पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा