साताऱ्याची एक अविस्मरणीय सहल!

सातारा हे सह्याद्रीतल्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं शहर. निसर्गाने या जिल्ह्याला खूप काही भरभरून दिलं.
मग ते थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर,पाचगणी असो वा समर्थ रामदास स्वामी यांची समाधी असलेला सज्जनगड असो,ठोसेघर,वासोटा किल्ला असो किंवा कोयना,कृष्णा या नद्यांचे उगम स्थान असो. कासचे पुष्प पठार हे जैवविविधतेने नटलेले सुंदर ठिकाण. पर्यटक या जिल्ह्याला वर्षभर भेट देत असतात.



आम्ही देखील फेब्रुवारी महिन्यात वज्राई धबधबा आणि कास तलाव बघायला जायचं असं ठरवलं. दिवस होता २ फेब्रुवारीचा. पहाटे ३:३०ला उठून सगळ्यांची तयारी सुरू झाली. ५च्या आसपास आम्ही साताऱ्याच्यादिशेने रवाना झालो. सकाळची गुलाबी थंडी मनाला सुखावणारी होती. जिथे नजर जाईल तिथे दाट धुके दिसत होते.
खंडाळा येथील खंबाटकी घाटात असताना सूर्योदय होत होता. सूर्याचे ते विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटत होते.


 ८ वाजताच्या सुमारास आम्ही साताऱ्यातील कुरणेश्वर मंदिरात पोहचलो. देवाचं दर्शन घेऊन गरम पोह्यांवर ताव मारून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. 
 
रस्त्याच्या एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. त्या दरीतील नदीचे विलोभनीय दृश्य दिसत होते. पाण्यावर सूर्यप्रकाश पडल्याने पाणी चमकत होते.वीस-पंचवीस किलोमीटर अंतर पार केल्यावर आम्हाला विस्तीर्ण असे कास पठार दिसू लागले होते. अर्थातच फुलांचा बहर नसल्याने पठार कोरडेठाक पडलं होतं. तरीही थोडेफार हिरवे गवत होतेच. दूरपर्यंत जिथे नजर जाईल तिथे डोंगर दिसत होते आणि त्यांवरील काही हिरवे असलेले झाडे मनाला आल्हाददायक सुख देत होते.
लवकरच आम्ही कास तलावाच्या आवारात पोहचलो. पाण्यात भिजण्याचा आनंद लुटला. काही जण फोटो काढण्यात मग्न होते. तिथे मजा करून आम्ही भांबवली गावाकडे प्रस्थान केले. 

खरी मजा आणि सहलीचा मुख्य भाग आता येणार होता. 

भांबवली गावातून आम्ही वज्राई धबधब्याकडे निघालो. गावातील एक काका आम्हाला मार्गदर्शन करणार होते. 

माझा वैयक्तिक ट्रेकिंगचा पहिलाच अनुभव असल्याने उत्साह होता. वाट कशी आहे हे माहीत नव्हतं. सुरुवातीला फार सोपं वाटलं. पण जसजसं आम्ही पुढे सरकत गेलो तसतसं आम्हाला पायवाट जरा अवघड वाटू लागली.  काका पुढे पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे जात होतो. ते स्थानिक असल्यामुळे ते चालण्यात आणि त्या घनदाट जंगलातून वाट काढण्यात सराईत होते.एका बाजूला झाडेझुडपांनी झाकली गेलेली दरी होती तर दुसऱ्या बाजूला डोंगर होता. मी आजूबाजूला असलेल्या झाडांना निरखून बघत होतो. फुले,पाने मनमोहक होती. 



तब्बल १-१:३० तासाच्या चालण्यानंतर आम्हाला आता धबधब्याचा आवाज ऐकू येऊ लागला होता. काही क्षणातच आम्हाला धबधब्याचे दर्शन झाले. पांढरे शुभ्र फेसाळलेले पाणी मोठ्या खडकांना धडकून आपल्या रेखाटलेल्या वाटेवरून जात होते. तसे पाणी कमीच होते कारण फेब्रुवारीचा महिना होता. धबधबा तीन टप्प्यांमध्ये पडत असल्याने याचे एक वेगळेच आकर्षण लोकांमध्ये असते. तो धबधब्याचा परिसर मोठमोठ्या खडकांनी वेढलेला होता. पाणी कमी असले तरी पाण्याला बराच वेग होता.


धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद वेगळाच  अनुभव देऊन गेला.
पावसाळ्यात तिथे पोहचणे जरा अवघडच असते. पाण्यात खेळण्याचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पाय वळत नव्हते पण परत जाणे भाग होते. परत जाताना मात्र काही लोक थकले होते. पण कसं तरी आम्ही परत ती पायवाट चालून गावापर्यंत पोहचलो.
चालून चालून खूप भूक लागली होती.स्वादिष्ट असे जेवण आमची वाट बघत होते. हातपाय धुवून आम्ही सगळे जेवायला बसलो. जेवण झाल्यावर मस्त गोड श्रीखंडाचा आस्वाद घेता आला. जेवण झाल्यावर सगळे सुस्तावले. थोडी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही सूर्यास्त बघायला निघालो. 

तांबीच्या सनसेट पॉइंटवरून आम्ही सूर्यास्त बघणार होतो. १५ मिनिटांची पायवाट चढून आम्ही वर पठारावर पोहचलो. सूर्यकिरणे मंद होऊन आकाश नारंगी झाले होते.पठारावर संथ गतीने थंड वारा वाहत होता. पठारावरून कोयना नदीचे भव्य रूप दिसत होते. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर वासोटा किल्ला धुक्याच्या चादरीत झाकला गेलेला दिसत होता. त्या सगळ्या दृश्यांची डोळ्यात साठवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 

सगळे आता थकले होते घरी परतण्याची वेळ झाली होती.
परतीच्या प्रवासात आम्हाला सातारा रात्रीच्या काळोखात उजळून निघालेले दिसले.

या सहलीचा अमूल्य अनुभव मनात साठवून आम्ही आमच्या रोजच्या व्यस्त असलेल्या आयुष्याचा प्रवास करण्यास वाटचाल सुरू केली.

----------------------------------×××---------------------------------
या लिखाणाचा जिवंत अनुभव यावा यासाठी काही चित्रांचा समावेश करत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी माझी कल्पवृक्षाची सावली!

आपला शेतकरी राजा