मराठी माझी कल्पवृक्षाची सावली!

 लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।
― कवी सुरेश भट

मराठी- एक समृद्ध भाषा,महाराष्ट्र आणि गोव्याची राजभाषा.भारतात हिंदी आणि बंगाली नंतर तिसरी मुख्य बोलली जाणारी भाषा. जगात मराठी ही पंधराव्या क्रमांकावर आहे आणि ही मराठी माणसांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. लोकांच्या स्थलांतरामुळे मराठी ही जगाच्या आणखी काही भागांमध्ये बोलली जाते. अमृताहूनी गोड आहे आपली मायबोली मराठी.
मॉरिशस,इस्रायल मध्येही मराठी प्रामुख्याने बोलली जाते.
म्हणूनच आपल्या या अमूल्य ठेव्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे! पुढील पिढ्यांना माय मराठीची ख्याती आणि महती कळावी यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असायला पाहिजे.मराठी संस्कृती जपत तिला जगासमोर आणण्यात आपण तत्परता दाखवली पाहिजे. तरच मराठी नामशेष होण्यापासून वाचू शकते!


प्रत्येक भाषेला एक इतिहास असतो त्याच प्रमाणे मराठी देखील एक बरीच जुनी भाषा आहे.मराठीचा उगम हा महाराष्ट्री प्राकृत, सातवाहनांच्या साम्राज्यात वापरल्या जाणाऱ्या भाषेतून झाला आहे.मराठी भाषेला अनेक कवी,लेखक,साधू-संत,इतिहासकार, यांनी त्यांच्या कामातून समृद्ध केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी भाषा स्वराज्यात प्रचलित झाली आणि मराठीला एक नवी उभारी मिळाली.
विविध लेख,कविता,भजन,पोवाडे,अभंग,किर्तनांनी मराठी भाषेचा पाया रचला,मराठी साहित्याला एका उंचीवर नेऊन ठेवले.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,संत बहिणाबाई,संत नामदेव,संत एकनाथ आदींनी आपल्या अभंग,भारुड,कविता,ओव्यांनी मराठी भाषेचे वाङ्मय समृद्ध केले.
संत नामदेव यांनी मराठी भाषेचा प्रचार पंजाब प्रांतात देखील केला होता.

।।संत कान्होपात्रांनी लिहिलेला एक अभंग।।

नको देवराया, अंत आता पाहू ।
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे ॥१॥

हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरियेले ।
मजलागी जाहले तैसे देवा ॥२॥

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी ।
धावे हो जननी विठाबाई ॥३॥

मोकलूनी आस, जाहले उदास ।
घेई कान्होपात्रेस हृदयात ॥४॥
-----------------------------------------------
या अभंगाचा सारांश मी पुढे कधीतरी लिहीन.

महाराष्ट्रात मराठीचे अनेक वेगळे रूपं आहेत. विदर्भात वऱ्हाडी,उत्तर महाराष्ट्रात
खान्देशी/अहिराणी,कोकण-मुंबईत कोकणी या बोली भाषा आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील स्थानिक वेगळ्या प्रकारे मराठी बोलतात. साताऱ्यातील माण या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेला माणदेशी हे नाव पडले असावे.

मातृभाषा म्हणून मला मराठीचा अभिमान आहे. मातृभाषेतून भावना व्यक्त करणे हे इतर भाषेपेक्षा कधीही सोयीस्कर असते.आपले विचार,मतं मांडणे हे सोपे असते.

मराठी भाषा दिन हा विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच "कुसुमाग्रज" यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो.ते उत्कृष्ट लेखक,कवी,नाटककार होते. त्यांच्या विविध कविता,लेखांनी,नाटकांनी मराठी भाषेला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांचा जन्मदिन "मराठी राजभाषा दिवस" म्हणून घोषित केला.

हासरा नाचरा, जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला.

तांबुस कोमल पाऊल टाकीत
भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे
आकाशवाटेने श्रावण आला.

लपत, छपत, हिरव्या रानात,
केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी
संध्येच्या गगनी श्रावण आला.

लपे ढगामागे, धावे माळावर,
असा खेळकर श्रावण आला
सृष्टीत सुखाची करीत पेरणी
आनंदाचा धनी श्रावण आला.

―कुसुमाग्रजांनी श्रावणमासावर लिहिलेली एक सुंदर कविता.


आजच म्हणजे "मराठी राजभाषा दिनी" महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचे विधेयक मंजूर केले. यामुळे आता लोकांमध्ये मराठीचे कुतूहल वाढेल आणि मराठीचा विस्तार होण्यास मदत होईल.

आपणही आपआपल्या पद्धतीने मराठी जपण्याचा प्रयत्न करूया आणि मराठीला सर्वोच्च स्तरावर पोहचवण्याचा प्रयत्न करूया.आपल्या पूर्वजांना आपला अभिमान वाटेल अशी कामगिरी करूया.
―――――――――――――――――――――――――

।।जय महाराष्ट्र।।


टिप्पण्या

  1. मस्त लिहला आहे... मराठी भाषेचे अतुलनीय वर्णन केलं आहे. मराठी भाषेची जोपासना करण्यासाठी ब्लॉग लिहण्याबद्दल
    धन्यवाद...👍🙏🏻

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साताऱ्याची एक अविस्मरणीय सहल!

आपला शेतकरी राजा