अमेझिंग महाराष्ट्र(भाग १)
महाराष्ट्र भारतातील एक विविधतेने नटलेला प्रदेश आहे.थोर,पराक्रमी आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी. शेतकरी,कष्टकऱ्यांची भूमी. मेहनत,कष्ट,पराक्रम आदी गुण या भूमीच्या मातीत पार जुन्या काळापासून रुजलेले.
जैवविविधता,कला-क्रीडा,उद्योग-धंदा,संस्कृती,शिक्षण,
पर्यटन आणि इतर बऱ्याच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर गडचिरोली आणि आसपासच्या परिसरात घनदाट जंगल आहे.मराठवाडा मात्र कोरडा भाग आहे. पश्चिम भाग विस्तीर्ण सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे. सह्याद्रीच्या आणखी पश्चिमेस गेल्यास समृद्ध अशी कोकण किनारपट्टी आहे.
सह्याद्रीचा कोकणाकडचा भाग सदाहरित जंगलाने वेढलेला आहे. कृष्णा,गोदावरी,नर्मदा,तापी,पूर्णा या काही प्रमुख नद्या आहेत. या नद्यांच्या बऱ्याच उपनद्या आहेत त्यामध्ये कोयना,भीमा,इंद्रायणी,पैनगंगा,वैनगंगा यांचा समावेश आहे.या नद्यांमुळे शेतीस खूप फायदा होतो.
महाराष्ट्राच्या इतिहासात बरेच कर्तृत्ववान लोक होऊन गेले.बऱ्याच लोकांचे असामान्य कर्तृत्व हे अजूनही काही लोकांना ज्ञात नाही.सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू करून समाजाला आशेचा किरण दाखवला.
डॉ. आनंदी गोपाळ जोशी या भारतातील पहिल्या डॉक्टर महाराष्ट्रातच जन्मल्या. रमाबाई रानडे यांनी समाजसेवेत आपला ठसा उमटवून आदर्श स्थापन केला.महिला सशक्तीकरण हे महाराष्ट्रात आधीपासूनच अस्तित्वात आहे.
महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत. प्रमुख शहरांमध्ये मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होतो.
प्रत्येक जिल्ह्याला ऐतिहासिक व सांस्कृतिक वसा लाभलेला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तर पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात.नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.नाशिक तेथील द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर जळगाव,नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्र अनुक्रमे केळी,संत्री आणि ऊसासाठी प्रसिद्ध आहेत.
पर्यटन:-
महाराष्ट्रात ३००-४०० गडकिल्ले आहेत. त्यापैकी काही प्रमुख किल्ले म्हणजे रायगड,शिवनेरी,प्रतापगड,पुरंदर.
अथांग समुद्रकिनारे व आंबा,काजू,सुपारी,नारळ यांच्या बागा म्हणजे कोकणाचे वैभव!
यासगळ्यांबरोबरच ताडोबा-अंधारी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प देखील तितकेच प्रसिद्ध आहेत. तिर्थक्षेत्रांमध्ये पंढरपूर,शेगाव,शिर्डी ही ठिकाणे देशभरात प्रसिद्ध आहेत.१२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ महाराष्ट्रात आहेत. देवीची साडेतीन शक्तीपीठं आणि अष्टविनायक गणपती हेदेखील महाराष्ट्रातच आहेत. अजिंठा-वेरूळ येथील बौद्ध लेण्या बघायला देश-विदेशातून लोक येत असतात.
महाबळेश्वर,पाचगणी,चिखलदरा,माथेरान यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा देश-विदेशातल्या लोकांची वर्षभर वर्दळ असते.
आधुनिक महाराष्ट्राला संत परंपरेचा वसा लाभलेला आहे.पंढरीच्या वारीची परंपरा ही तब्बल ३३५ वर्षे जुनी आहे.संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत मुक्ताबाई,संत एकनाथ ,संत बहिणाबाई आदींच्या ओव्या,अभंगांनी मराठी साहित्याचा पाया रचला. जीवन कसे जगावे,लोकांचा आदर-सन्मान कसा करावा हे सगळं हे थोर संत शिकवून गेले.
संत बहिणाबाईंचा मला भावलेला अभंग.
-------------------------------------------------------------------
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।
अरे संसार संसार, खोटा कधी म्हनू नाही
राउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही ।
अरे संसार संसार, नाही रडन कुढन
येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।
एक संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,
देतो सुखाले नकार, अन् दुखाले होकार ।
-------------------------------------------------------------------
महाराष्ट्र ही बऱ्याच खेळाडू,गायक,राजकारणी,समाजसुधारक यांची कर्मभूमी होती आणि राहील. लता मंगेशकर,सचिन तेंडुलकर,बाबा आमटे,बाळासाहेब ठाकरे ही काही प्रमुख नावे.
आपल्या कर्तृत्वाने या लोकांनी महाराष्ट्रच नव्हे तर देशाचेही नाव जगभरात पोहचवले.
महाराष्ट्र सदैव वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगतशील राहील ही खात्री आहे.
बोलावे तितके कमीच आहे या भूमीबद्दल. गर्व आणि अभिमान आहे मला या समृद्ध मातीत जन्म घेतल्याचा!
बरंच आहे लिहिण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी पण काही मर्यादा असल्यामुळे मी जास्त लिहणार नाही. पुढच्या वेळेस आणखी काही रोमांचक माहितीसोबत येईन. तो पर्यंत नक्की वाट बघा.
||जय महाराष्ट्र | जय शिवराय ||
――――――――――――――――――――――――
रायगड किल्ला
कास तलाव
संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर,आळंदी
अलिबाग येथील समुद्रकिनारा
सह्याद्री पर्वतरांग
रमण सायन्स सेंटर,नागपूर
इंद्रायणी नदी,देहू(पुणे)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा